
मुंबई-हिंगणघाट
हिंगणघाट बस स्थानक परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला गती परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना मंत्रालयात निवेदन सादर
हिंगणघाट शहरातील बस स्थानक परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीला आता अधिक गती मिळाली असून मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना शिंदे गट च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
यापूर्वी सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद (वर्धा जिल्हा) वतीने मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे मा. तहसीलदार, हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. त्या निवेदनामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे राष्ट्रासाठीचे अतुलनीय बलिदान, धर्मरक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य लक्षात घेता हिंगणघाट बस स्थानक परिसरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीच्या अनुषंगाने आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हिंगणघाट–समुद्रपूर–सिंधी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. प्रताप सरनाईक यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून हा हिंगणघाट मधील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असून सरनाईक यांना कुणावार यांनी पुतळा उभारणीचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसांत सादर करण्यात यावा, अशी त्यांनी आवर्जून विनंती केली. या मागणीची दखल घेत मा. प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सहमती दर्शविली.या वेळी निवेदन देतांना विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, हिंगणघाट येथील विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश तुळसकर, नगरसेवक बंटी वाघमारे, सुनील राऊत, मनोज जुमडे या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्ररक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. त्यांचे जीवनचरित्र युवकांसाठी प्रेरणादायी असून समाजामध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि संस्कृतीप्रती अभिमान जागृत करणारे आहे. हिंगणघाट बस स्थानक हे शहरातील प्रमुख आणि वर्दळीचे ठिकाण असल्याने या परिसरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यास नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना इतिहासाची सातत्याने प्रेरणा मिळेल.
सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शासनाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह असून शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करणारा हा पुतळा हिंगणघाटच्या वैभवात भर घालणारा ठरेल, तसेच भावी पिढ्यांना राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. 









