
प्रतिनिधी : शुभम सराफ, हिंगणी
हिंगणी : “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंगणी व धामणगाव येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध मान्यवर, ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
दि. 05 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बहादुरे व डॉ. मयूर नगमोते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण, हरित परिसर निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत हिंगणीच्या प्रशासक मा. श्रीमती दामिनीताई डेकाटे, ग्रामविकास अधिकारी श्री. अतुल भोगे, मा. प्रमोदरावजी डेकाटे, ग्रामपंचायत लिपिक श्री. शंकरराव बोरले, धामणगावचे पोलीस पाटील श्री. अमोल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच आरोग्य सेवक श्री. संदीप कोहळे, आरोग्य सेविका श्रीमती संगीता मांढरे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटांच्या सदस्या तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व विषद करत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमामुळे गाव परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व आरोग्यदायी बनण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
📌 फोटो कॅप्शन :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करताना.










