
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात वाहितपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, रेल्वे रुळांवर एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सुमित अरुण वरघणे (वय ३०, रा. वाहिदपूर) यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून, दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत असले, तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा टोकाचा निर्णय घेतला गेला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नैराश्याच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, लवकरच घटनेमागील सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










