
सेलू : शहरातील जयस्वाल ले-आऊट परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य संगीतमय देवी भागवत महाकथा व ज्ञानयज्ञ सोहळा काल भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गेल्या तब्बल ९ वर्षांपासून श्रीमद् भागवत आयोजन समितीच्या माध्यमातून हा आध्यात्मिक व संस्कारमय उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या उपक्रमाची संपूर्ण सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्तुती होत आहे.
आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलांमध्ये संस्कारांची कमतरता जाणवत असताना, भागवत आयोजन समितीने सुरू केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने महिला, युवक, वारकरी व लहान मुले सहभागी होत असून कथा, हरिपाठ, दिंडी सोहळा आणि महाप्रसादाच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच चांगले संस्कारही रुजवले जात आहेत.
विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी आयोजकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पालक वर्गातूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
यंदाच्या कार्यक्रमात ह.भ.प. सुश्री स्नेहांगा श्रीजी (आळंदीकर) यांच्या अमृतमय वाणीतून देवी भागवत कथेमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
भव्य दिंडी सोहळ्याने संपूर्ण सेलू शहर दुमदुमून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका आणि वारकऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडी मार्गावर जागोजागी विविध सामाजिक संस्थांकडून व नागरिकांकडून लंगर व पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. भाविकांसाठी करण्यात आलेल्या सेवेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तसेच काल भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानदात्यांचे भागवत आयोजन समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारे सहकार्य व आशीर्वाद कायम ठेवावा, अशी विनंती आयोजकांनी यावेळी केली.
तसेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मंडळातील सर्व लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. विशेषतः महिला मंडळींनी नियोजन, भोजन व्यवस्था, महाप्रसाद, भक्तांची सेवा आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचेही सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमद् भागवत आयोजन समितीचे अध्यक्ष भगवान नागोसे, उपाध्यक्ष शंकर दंढारे, सचिव मोहित सोनटक्के तसेच सर्व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि भागवत प्रेमींनी परिश्रम घेतले. समाजात अध्यात्मासोबत संस्कारांची जोपासना करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सेलू तालुक्यात भागवत आयोजन समितीच्या









