
त्रिरत्न बौद्ध महासंघ, वर्धा केंद्राच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमाला अंतर्गत शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, चिंतनशील आणि संघचैतन्याने भारलेला अशा मंगलमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून आदरणीय धम्मचारिणी श्रद्धावज्री यांची उपस्थिती लाभली. त्यांनी “धम्मप्रेरित युवक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवसमाजाचे शिलेदार” या विषयावर अत्यंत प्रभावी, समर्पक आणि हृदयाला स्पर्श करणारे मार्गदर्शन केले. आपल्या उर्जावान व जोशपूर्ण व्याख्यानातून त्यांनी युवकांना जागृत करत सांगितले की, तारुण्य ही केवळ उमेदीची अवस्था नसून ती परिवर्तनाची, ध्येयाची आणि समाजनिर्मितीची सुवर्णसंधी आहे.भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर आणि संत गाडगेबाबा या महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्या तारुण्यात घेतलेले निर्णायक आणि दूरदर्शी निर्णय आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत, असे त्यांनी नमूद केले. त्या महान विभूतींच्या जीवनातून प्रेरणा घेत, युवकांनीही ध्येयाने प्रेरित होऊन समाजासाठी योगदान देण्याचा ठाम संकल्प करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.त्यांनी पुढे असेही सांगितले की, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान त्यागामुळेच आज आपण सन्मानाने, स्वाभिमानाने आणि जागृततेने जीवन जगत आहोत. या कृतज्ञतेची जाणीव सदैव मनात ठेवून युवकांनी नवसमाजाच्या निर्मितीसाठी अखंड प्रयत्नशील राहिले पाहिजे. बुद्धांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या स्वातंत्र्यप्रिय, समतामूलक, न्यायनिष्ठ आणि करुणामय नवसमाजाच्या संकल्पनेचे खरे घटक बनण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर पूर्वीपेक्षा अधिक आहे, असे त्यांनी ठामपणे व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय धम्मचारी सुपद्म यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे कार्य, त्यामागील समूहभावना, मैत्री आणि एकतेची शक्ती यावर प्रकाश टाकत, संघटित प्रयत्नांद्वारे समाजपरिवर्तन कसे घडवून आणता येते याचे प्रेरणादायी विवेचन केले. तसेच सर्व उपस्थितांचे त्यांनी अत्यंत मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी अमितप्रभा यांनी अत्यंत प्रभावी व नेटक्या पद्धतीने पार पाडले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय धम्मचारिणी विद्यादर्शनी यांनी सुबोध आणि आकर्षक शैलीत करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्मचारी वरधम्म यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त केले.या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावित इमारत प्रकल्पासाठी *धम्ममित्र विलास आटे आणि धम्ममित्र सिद्धार्थ नगराळे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची उदार अंतःकरणाने दान देऊन प्रकल्पाच्या बांधकामासाठी मुक्त हस्ते हातभार लावला. त्यांच्या या उदात्त सहकार्याबद्दल त्यांचा सन्मान आदरणीय धम्मचारिणी श्रद्धावज्री यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात प्रदीप लोखंडे यांनी सादर केलेल्या बुद्धगीतांनी वातावरण अधिकच भावपूर्ण आणि मंगलमय झाले.नेहमीप्रमाणे सर्व धम्मचारी, धम्मचारिणी तसेच धम्ममित्र बंधू-भगिनींनी संघचैतन्य, एकता आणि निःस्वार्थ सेवाभाव यांची प्रचिती देत कार्यक्रमाच्या सर्व कामात सक्रिय सहभाग नोंदविला. तीनही दिवसांची ही व्याख्यानमाला एकोप्याने, समर्पणाने आणि अंतःकरणातील संघभावनेने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.या सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्व धम्ममित्रांचे मनःपूर्वक पुण्यानुमोदन व कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने शांत, समाधानी आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली.













