
सेलू (प्रतिनिधी):
मोबाईल हिसकावण्याच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना सेलू येथे उघडकीस आली आहे. बेलगाव येथील प्रवीण योगीराज राऊत (वय 20) हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत 10 एप्रिल 2026 रोजी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, संबंधित तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी सूरज रमेश ढगे (वय 20) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान आरोपीला ‘खाक्या’ दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
प्राथमिक चौकशीत मोबाईल हिसकावण्याच्या वादातून आरोपीने प्रवीण राऊत याच्यावर दगडाने हल्ला करून त्याचा खून केल्याचे समोर आले. त्यानंतर मृतदेह सेलू येथील विश्रामगृहाच्या मागील डोहात फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
या गुन्ह्यात आणखी एक सहआरोपी असल्याची माहिती समोर आली असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अंमलदार अखिलेश गव्हाणे, मनोहर मुंडे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे यांनी कारवाई केली. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास पोलिस अधिकारी प्रीतम निगडे करत आहेत.
👉 या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सेलू येथे मोबाईलच्या वादातून तरुणाचा







