
सेलू शहरात सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाला शहरातील नागरिक, महिला भगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सुश्री मीनाक्षी सहरावत (पीएचडी, दिल्ली) उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “हिंदू समाज धोक्यात आहे असे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःकडे आत्मपरीक्षण करून पाहणे गरजेचे आहे. येणारी पिढी संस्कारी व सक्षम बनवायची असेल तर सर्व माता-भगिनींनी आपल्या घरात गुरुकुल परंपरा सुरू करावी.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संमेलनादरम्यान जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवनजी सुर्वे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. शेखरजी केळकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. विनोदजी महाराज जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या दिंडी यात्रेने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बरडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना भोजन प्रसाद देण्यात आला तसेच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हे भव्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज, सामाजिक कार्यकर्ते, विविध हिंदू संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.







